पिंपरी : शाॅर्टसर्किटमुळे क्लिनिकला आग लागून दोन संगणक, यूपीएस, तसेच इतर मशीन जळून दोन लाखांचे नुकसान झाले. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोरील व्यावसायिक इमारतीत सोमवारी (दि. २२) पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथे पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एका व्यावसायिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर क्लिनिक आहे. तेथील बॅकअप रुममध्ये असलेल्या एसीमधून मोठा धूर निघत असल्याचे इमारतीच्या वाॅचमनच्या निदर्शनास आले.
याबाबत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशामक केंद्राला माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्य केंद्रातील एक व प्राधिकरण उपकेंद्रातील एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. पावणेसातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शाॅर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आगीत एसी, दोन संगणक, यूपीएस, बॅटऱ्या, इतर मशीन व वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.