पिंपरी : शहरातील कंपनीत अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. पिंपरी येथे शनिवारी (दि. २३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी एक तास शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या पाठीमागे गांधीनगर येथे एलांटास बॅक इंडिया लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या एका इमारतीत शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीचे लोळ तसेच धुराचे लोट उठले. त्यामुळे कंपनीबाहेर गर्दी झाली. याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पाच बंंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच कंपनीत देखील आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्याची मदत झाली.
दरम्यान, कंपनीला शनिवारी सुटी असल्याने कामकाज बंद होते. त्यामुळे कर्मचारी किंवा इतर कोणीही कंपनीत नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत माहिती दिली. आगीचे कारण समजू शकलेले नाही.