पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली.
भोसरी एमआयडीसीतील पवना इंडस्ट्रीज येथील २१ नंबरच्या गाळयात कृष्णा प्रिंटर्स हा कागद छपाईचा कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास येथे नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करीत असताना १ वाजून ४० मिनिटांनी अचानक आग लागली. याठिकाणी मोठ्याप्रमाणात कागद असल्याने सुमारे ३० मीटर अंतरापर्यंत धूर पसरला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात धूर असल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचणे कठीण होते. अशातही अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन दीड तासात आग आटोक्यात आणली. निगडी प्राधिकरण आणि भोसरी केंद्राची प्रत्येकी एक तर संत तुकारामनगर केंद्राच्या चार अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, प्रसाद चव्हाण, नामदेव शिंगाडे यांच्यासह ३० ते ३५ कर्मचारयांनी आग आटोक्यात आणली.