हिंजवडी : येथील माण रस्त्यावर असलेल्या एका रहिवाशी सोसायटीत आगीची दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जावनांनी तत्परता दाखवत आत मध्ये अडकलेल्या तेरा जणांची सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी (दि.१८) रात्री सातच्या सुमारास टप्पा क्रमांक एक मधील माण रस्त्यावर असलेल्या अशोक मिडोज रहिवाशी प्रकल्पातील एका इमारती मध्ये अचानक आग लागली.
इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर धुराचे प्रचंड लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली, जवळच असलेल्या अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट जवळील मोकळ्या भागात असलेल्या विद्युत केबल्सला अचानक आग लागल्याने परिसरात धूर आणि आगीचे लोळ पसरले. यावेळी धुरामुळे घाबरलेल्या परिस्थितीत तेरा नागरिक आतमध्ये अडकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, सोसायटी धारकांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, बारा मजली इमारत असल्याने वरील मजल्यावरील सर्व नागरिक सुरक्षेच्या कारणास्तव टेरेसवरून बाजूच्या इमारती मध्ये प्रवेश करून खाली आले. अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, आगीच्या मजल्यावर मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे .
मोठा अनर्थ टळला...
मुळशीतील पिरंगुट एमआयडीसी आग प्रकरण ताजे असतानाच, शुक्रवारी रात्री हिंजवडीतील माण रस्त्यावर असलेल्या बारा मजली रहिवाशी सोसायटीत आग लागल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. हवेत धुराचे लोट पसरल्याने सोसायटीमध्ये गोंधळ उडाला होता. परिस्थिती तात्काळ आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
अग्निशामक दलाची तत्परता...
माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, आग आणि धुराचे लोट पसरल्याने रहिवाशी घाबरले होते. चौथा आणि पाचवा मजला धुराने वेढला होता. मात्र, अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. पीएमआरडीए आणि फेज तीनमधील अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी पोहचल्या होत्या. सुरक्षेसाठी वारिल मजल्यावरील रहिवाशांनी छतावर जाऊन बाजूच्या इमारती मधून खाली आले. मोठी दुर्घटना टळली.
- रामदास चोरगे, अग्निशमन अधिकारी, हिंजवडी.