पिंपरी : महापालिकेच्या नेहरुनगर, पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये शाॅर्टसर्कीट होऊन ट्रान्सफार्मरला आग लागली. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र आग लागलीच विझल्याने अनर्थ टळला. सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.
जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता डाॅ. संग्राम कपोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंटरमधील आयसीयू कक्षाला लागून मागच्या बाजूला वीज ट्रान्सफार्मर आहेत. यातील एका ट्रान्सफार्मरला शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. वीजपुरवठा खंडीत झाल्याने ही बाब लागलीच निदर्शनास आली. याबाबत महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब लागलीच दाखल झाला. दरम्यान किरकोळ स्वरुपाची असल्याने आग लागलीच विझली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या घटनेत कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही.