नेहरुनगर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुबी एलकेअर या विभागात ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. तातडीने रुग्णांना दुसऱ्या विभागात हलविले. मात्र, आगीच्या धुरामध्ये रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि नातेवाइकांना त्रास झाला. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या वर्षभरातील शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास रुबी एलकेअरमध्ये विभागामधील शस्त्रक्रिया विभागात ‘शॉर्ट सर्किट’मुळे ‘आॅक्टोक्लो’ या यंत्राला आग लागली. या वेळी या विभागात १५ रुग्ण होते. आग लागल्यानंतर रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयातील दोन रुग्णांना अतिदक्षता विभाग, तर इतर रुग्णांना तातडिक विभागात हलविले. दरम्यान, तातडीने अग्निशामक विभागाला कळविले. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील ‘फायर फायटिंग’ यंत्रणेचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. संत तुकारामनगर व प्राधिकरण अग्निशामक केंद्राच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवान तातडीने तोंडावर आॅक्सिजन लावून रुबी केअर विभागात शिरले. दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच महापौर शकुंतला धराडे, आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आदींनी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. (वार्ताहर)रुग्णांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळलीया घटनेवेळी रुबी केअर विभागात १५ रुग्ण होते. येथील कर्मचारी व डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता तातडिक विभागात हलविले. आगीमुळे धुराचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांना डोळ्यांना आग, मळमळ, श्वसनाचा त्रास होत होता. वेळीच सर्व रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीची दुसरी घटनासंत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या रुबी एलकेअर येथे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी २५ खाटांचा विभाग आहे. या विभागात २६ एप्रिल २०१५ रोजी देखील शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. या वेळी आगीपेक्षा धुराचे प्रमाण जास्त होते. त्या वेळी विभागातील विद्युत यंत्रणा जळाली होती.
‘वायसीएम’मध्ये आग
By admin | Published: October 16, 2015 1:05 AM