पिंपरी - महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, निधी मिळण्याची प्रतिक्षा होती. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून २७ कोटी रुपये निधीचा पहिला हप्ता नुकताच मंजूर झाला आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पाच वर्षांच्या कालावधीत केंद्राकडून ५०० कोटी, राज्य शासनाकडून २५० कोटींचा निधी मिळणार आहे, तर पालिकेचा २५० कोटींचा स्वहिस्सा असेल. दरम्यान, २७ कोटींचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड प्रकल्प निधीत केंद्राकडून १६ कोटी व राज्याकडून ८ कोटी, तर प्रशासकीय कार्यालयीन खर्चासाठी केंद्राकडून २ कोटी व राज्याकडून १ कोटी असे केंद्राकडून १८ कोटी व राज्य शासनाकडून ९ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.आतापर्यंत पालिकेने स्वखर्चाने विविध कामे केली होती. एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. हा निधी मिळाल्याने निविदा प्रक्रिया मार्गी लागणार आहे.आणखी १६५ कोटींची अपेक्षास्मार्ट सिटी अभियानातून नवी मुंबई बाहेर पडल्याने या अभियानात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला. दरम्यान, पालिकेने ३१ मार्च २०१७ पर्यंत राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्राकडे स्मार्ट सिटीचा सविस्तर विकास आराखडा पाठविला होता. त्यानंतर केंद्र व राज्याकडून निधीसाठी पाठपुरावा सुरू केला. केंद्राकडून एकूण १९२ कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा होती. त्यांपैकी २७ कोटींचा पहिला हप्ता शनिवारी मंजूर झाला आहे. उर्वरित निधीचा महापालिका पदाधिकारी व प्रशासनाला केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.पाणी योजनेसाठी १३ कोटींची तरतूदजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियानामध्ये ‘पिंपरी-चिंचवड ताथवडे पाणीपुरवठा’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडील तिसऱ्या हप्त्याचा एक कोटी ६५ लाख ४२ हजारांचा निधी, तसेच २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडील दुसºया हप्त्याचा चार कोटी २९ लाख ४८ हजार इतका निधी २८ फेबु्रवारी २०१८ ला मंजूर करण्यात आला आहे. तसेच ताथवडे पाणीपुरवठा योजनेसाठी उर्वरित केंद्र व राज्य शासनाकडील एकूण सहा कोटी ९४ लाख ७७ हजार इतका निधी २९ मार्च २०१८ लाख मंजूर झाला आहे. याप्रमाणे जेएनएनयूआरएम अंतर्गत ताथवडे पाणीपुरवठा योजना व २४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण १२ कोटी ८९ लाख ६७ हजार इतका निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २७ कोटींचा पहिला हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:02 AM