पिंपरी : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये ११ वी प्रवेशाची विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी लावली जाणार आहे. ११ वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होताच, त्याआधारे ६ ते ९ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दहावीचा निकाल जाहीर होऊन २० दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर १० दिवस झाले. काही महाविद्यालयांनी त्याच संस्थेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी मात्र लावली आहे. सर्वसमावेशक यादी न लावल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. गुरुवारी पहिली यादी जाहीर होणार असल्याने या यादीसाठी विद्यार्थी, तसेच पालक प्रतीक्षेत आहेत. पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातील ५० टक्के प्रवेश आणि त्याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के कोटा अशी ७५ टक्के प्रवेशाची यादी झळकली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाचे नाव आॅनलाइन अर्जात प्राधान्यक्रमावर दिले आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.आॅनलाइन प्रवेश अर्जात किमान एक आणि अधिकाधिक दहा महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांची नावे प्राधान्याने दिली आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये घरापासून जवळ असलेल्या महाविद्यालयांची नावे विद्यार्थ्यांनी दिली आहेत. घरापासून काही अंतरावर असलेल्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.महाविद्यालयांचा गटनिहाय कोटा निश्चितमहाविद्यालयांमध्ये त्याच संस्थेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोटा २० टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के, बदलीवर आलेले शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्या मुलांसाठी ५ टक्के, कला क्षेत्रातील २ टक्के, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के, दिव्यांगांसाठी ३ टक्के, प्रकल्प बाधितांसाठी ५ टक्के कोटा, उर्वरित जागा खुल्या, सर्वसाधारण गटासाठी अशा स्वरूपात प्रवेशाचा कोटा निश्चित झालेला आहे.
पहिली यादी आज जाहीर; विद्यार्थ्यांना दिली ९ जुलैपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 6:49 AM