कामशेत : पवन मावळातील पवना धरणात दुर्मिळ व माणसासह धरणातील इतर माशांना धातक असलेला एक मासा मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला आहे. या माशाचे तोंड मगरी सारखे असून मागील भाग माशासारखा आहे. प्रथम या माशाला पाहून मच्छिमार घाबरले. मात्र हा मासा मृत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी त्याला घरी आणले. सध्या हा मासा कामशेत मध्ये कुतूहलाचा विषय झाला असून हा मासा पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करीत आहेत.तर जलचरांसाठी तसेच माणसादेखील धाेकादायक असलेला हा मासा धरणात अाला कसा असा प्रश्न तज्ञांना पडला अाहे.
पवना धरणामध्ये महेश तारू यांनी मंगळवारी जाळे लावले. बुधवारी ते काढण्यासाठी गेले असता जाळ्यात त्यांना दुर्मिळ तीन किलोचा गार प्रजातीचा अलीगेटर मासा दिसला. या माशाचे तोंड मगरी सारखे तीक्ष्ण, दात, जीभ, पाठीचा भाग तीव्र टणक, भयानक डोळे, नाकपुड्या आदी असल्याने सुरुवातीला ती मगर असल्याचे त्यांना वाटले. मात्र हा मासा त्यांनी निरखून पहिला असता हा वेगळाच व दुर्मिळ मासा असल्याने आणि हा आपल्या भागात मिळत नसल्याने त्यांनी उत्सुकतेपोटी घरी आणला. परिसरात ही माहिती पसरताच त्या माशाला पाहण्यासाठी नागरिकांची रीघ लागली. या मृत माशाचा जबडा उघडा असल्याने हात लावण्याची भिती नागरिकांना वाटत होती. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला.
या माशाविषयी माहिती घेतली असता, हा गार प्रजातीचा अलीगेटर नावाचा मासा असून त्याचे अस्तित्व लाखो वर्षांपूर्वी पासून असल्याचे कळते. हा मासा हिंस्र व मांसाहारी असून माणसांवर देखिल हल्ला करतो. विशेष म्हणजे याला मगरी सारखे तोंड आहे तर तोंडाच्या मागील भाग माशासारखा आहे. हा मासा पाण्यातील इतर जलचराना मोठ्या प्रमाणात आपले भक्ष बनवतो. मोठ्यातला मोठा जलचर प्राण्याला तो हल्ला करून सहज शिकार करतो. या माशाची लांबी साधारण दहा फुटापर्यंत वाढत असून वजन शंभर किलोच्या पुढे होत असते. हा हिंस्र मासा असून पवना धरणात आढळलेला मासा हा अजून लहान असल्याने त्यांची आणखी किती संख्या या धरणात आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात ही प्रजाती दुर्मिळ असून २०१५ मध्ये आंद्र प्रदेश व तेलंगना मध्ये या प्रजातीने धुमाकूळ माजवला होता. तर काही वर्षांपूर्वी हा मासा दादर मध्ये आढळण्याने या प्रजातीचे मासे अजून असल्यास इतर जलचरासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने भारतीय जीवशास्त्र विभागाच्या तज्ञांनी येथे विशेष सर्वे केला होता. प्रामुख्याने हा मासा नॉर्थ अमेरिका मध्ये पहावयास मिळतो. हि प्रजाती दुर्मिळ झाली असून अक्व्यारीयामध्ये ठेवण्यासाठी याला मोठी मागणी असल्याने त्याची तस्करी ही होते.
याविषयी पवना नगर पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ए एम गदवाल यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, या संदर्भात काम करणाऱ्या फिशरी विभागाशी संबंध असल्याने त्यांना याची माहिती देवून या संदर्भात जास्त माहिती घेण्यात येईल.