किवळे : गरजूंना अन्न व धान्य वाटप करणारे हे आरोग्यदृष्टया तंदुरुस्त नसतानाही ( अनफिट) अन्नधान्य वाटप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाटप करणाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र ( फिटनेस सर्टिफिकेट ) देहूरोड पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय ठाण्याच्या हद्दीत कोठेही गरजूंना धान्य व अन्न वाटप करू नये.असे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी कळविले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखप्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर देहूरोड -देहू परिसरात विविध व्यक्ती व काही संस्था गरजूंना धान्य व अन्न वाटप करीत आहेत. मात्र वाटप करणाऱ्यांमध्ये सर्व जण आरोग्यदृष्ट्या तंदुरुत असतीलच असे नाही. त्यामुळे वाटप करण्याची इच्छा असणारे व सध्या धान्य व अन्न वाटप करीत असलेल्यांनी स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देहूरोड पोलीस ठाण्यात सादर करावे. पोलीस ठाण्यातून वाटपाची परवानगी घ्यावी . त्यानंतरच देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाटप करण्यात यावे. परवानगी न घेता व वाटप करणाऱ्याने स्वतः चे मेडिकल न करता धान्य व अन्न वाटप करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर राष्टीय आपत्ती कायदा २००५ , साथ रोग प्रतिबंधक अधिनियम व भादवी कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.