पिंपरी : पनवेल महापालिकेत नोकरीला लावतो, असे आश्वासन देऊन तरुणाकडून साडेपाच लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केली. आरोपींनी तरुणाला पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र देखील दिले होते. ही घटना ३ डिसेंबर २०२१ ते १० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी नागेश तानाजी जगताप (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी गुरुवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप मारुती पांडव (वय ३०, रा. नवी मुंबई), जगन्नाथ बालकृष्ण (वय ३७, रा. जुईनगर, ठाणे), नितीन महादू वाघ (वय ३८. उल्वे, नवी मुंबई) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसांत संगनमत करून फिर्यादीस पनवेल महापालिकेत भरारी पथकामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यासोबतच नोकरी लावण्याकरिता डिपॉझीट म्हणून फिर्यादीकडून पाच लाख रुपये तसेच फी म्हणून ५० हजार रुपये असे साडेपाच लाख रुपये घेतले. आरोपींनी फिर्यादीच्या नावे पनवेल महापालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून दिले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी न देता फसवणूक केली. फिर्यादीने पैशांची मागणी केली असता दीड लाख रुपये परत करत चार लाख रुपयांची फसवणूक केली.