पिंपरी : स्थायी समितीच्या पाच सदस्य निवडीत आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली असून, ही निवड मंगळवारी करण्यात आली. भाजपाच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे या चार आणि अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांची वर्णी लागली आहे. महापौर नितीन काळजे यांनी निवडीची घोषणा केली.स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असला तरी दरवर्षी सोळापैकी आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. रिक्त झालेली नावे ही चिठ्ठीद्वारे काढली जातात. त्यात भाजपाचे ६ नगरसेवक बाहेर पडले होते. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड केली होती.दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपाने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सदस्यपदासाठी घेतलेले नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले होते. रिक्त जागाची निवड आज होणार होती. त्यात कोणत्या गटाला झुकते माप मिळणार याबाबत उत्सुकता होती. मंगळवारी दुपारी दोनला झालेल्या निवडणुकीत सुरुवातीला निवड झाली.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाच्या, तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाली.लांडगे गटाची सरशीअध्यक्षपद निवडीवरून भाजपात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यात संघर्ष झाला होता. लांडगे गटाने राजीनामाअस्त्र उगारले होते. त्यामुळे सदस्य निवडीत नाराज झालेल्या आमदार लांडगे गटाला झुकते माप दिले आहे. त्यात भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे अशा पाच जणांचे राजीनामे भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी घेतले होते. या जागांवरील निवड आज झाली. त्यात आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली.
‘स्थायी’वर पाच जणांना संधी, लांडगे गटाची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 2:41 AM