पिंपरी : सराईत गुन्हेगार अमोल गोरगले याचा नऊ ते दहा जणांनी मिळून खून केला. पुनावळे येथे सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, संशयितांना बुधवारी (दि. ३) वडगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (३५, रा. पुनावळे) असे खून झालेल्याचे नाव आहे. सुरज मुरलीधर गाडे (रा. गहुंजे, ता. मावळ), असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल याचा भाऊ समीर उर्फ गोट्या गजानन गोरगले (३२, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेखर अशोक ओव्हाळ (वय ३७), मुन्ना उर्फ अभिषेक बाळासाहेब ओव्हाळ (२४), समीर उर्फ बाबा नबी शेख (२०, तिघेही रा. पुनावळे), ऋषिकेश विनायक चव्हाण (२३, रा. सहकारनगर, पुणे), वैभव सुरेश गायकवाड (२१, रा. साळुंबरे, वडगाव, ता. मावळ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यासह रितेश रमेश ओव्हाळ (रा. पुनावळे), महेश कदम, गणेश कदम इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.