पिंपरी : घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी पोलीस असलेल्या महिलेचा छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून पोलीस कर्मचारी महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
पती पवनकुमार बंकिम दहिफळे (वय २९ ), सासू सागरबाई बंकिम दहिफळे (वय ४५), सासरे बंकिम बाबुराव दहिफळे (वय ५२), दिर भगवान उर्फ पप्पू बंकिम दहिफळे (वय २४), आज्जे सासू मुक्ताबाई नामदेव वाघ (वय ६५, सर्व रा. दैत्यनांदुरा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय २८ , रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने नाव आहे. याबाबत त्यांच्या आईने बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि पवनकुमार यांचा सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. श्रद्धा पुणे पोलीस दलात तर त्यांचे पती भारतीय नौदलात कार्यरत होते. लग्नानंतर सासरच्या लोकांनी श्रद्धा यांच्याकडे माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुला आम्ही नांदवणार नाही. तुला घटस्फोट द्यावा लागेल. नाहीतर तुला व तुझ्या बाळाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. श्रद्धा यांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून ५ जुलै रोजी कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीचा पोलिसांकडून सुरु होता
वाकड महिला पोलिसांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना येथे ५ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते. श्रध्दा या पुणे शहर दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस होत्या. त्यांचे पती नोकरीनिमित्त केरळला असून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांची मुलगी तिची आई श्रध्दा यांच्यासोबत वाकड येथे वास्तव्यास होती. श्रध्दा यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यानंतर श्रध्दा यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रध्दा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली आहे का, याचाही शोध पोलिसांकडून सुरू होता.