पिंपरी : एका संशयित आरोपीला पोलिसांनी पोलीस चौकीत आणले होते. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या थेट संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता सहा पोलीस कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. असे असतानाच एका संशयित आरोपीचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील एका पोलीस चौकीतील पोलिसांनी या संशयित आरोपीला पोलीस चौकीत आणले होते. त्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले होते. त्यामुळे या पोलिसांचा त्या आरोपीशी थेट संपर्क आला होता. त्याला चौकीतून सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ही बाब माहिती झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना चाचणीसाठी या पोलिसांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात आलेल्या आरोपीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळीही त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यामुळे संबंधित पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
‘पॉझिटिव्ह’आरोपीच्या संपर्कात आलेले पाच पोलीस क्वारंटाईन;शहर पोलीस दलात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:03 PM
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
ठळक मुद्देदुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात आलेल्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर