पिंपरी : लाॅकडाऊनमुळे बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू न झालेल्या नाहीत. लोकल, एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांना शहरातील रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच मावळ तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर पिंपरी-चिंचवड शहरात दापाेडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी असे पाच स्थानक आहेत. शहराची लोकसंख्या २५ लाखांवर असून हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. मात्र लाॅकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद झाल्याने या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनलाॅक होतानाच पुण्यातून काही रेल्वे सुरू करण्यात आल्या. यातील काही गाड्या पुणे-मुंबई दरम्यान सुरू झाल्या. मात्र यातील एकाही गाडीला पिंपरी-चिंचवड शहरात थांबा देण्यात आलेला नाही.
शहर व मावळ तालुक्यातून मुंबई व उपनगरांमध्ये नोकरीनिमित्त हजारो प्रवासी ये-जा करतात. या प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी पुणे स्थानक गाठावे लागते किंवा लोणावळा स्थानकावर जावे लागते. यासाठी मोठी कसरत करावी लागते. मुंबई येथे नोकरी असलेल्या नागरिाकंना खासगी वाहनाने मुंबईत जावे लागत आहे. हा प्रवास खर्चिक तसेच दगदगीचा व धोक्याचा आहे.
ठाणे, कल्याणला नाही गाडी मुबंई येथून सकाळी पुण्यासाठी इंद्रायणी व डेक्कन एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र पुणे येथून सकाळी मुंबईला जाण्यासाठी डेक्कनक्वीन ही एकच गाडी असूल ला पुणे ते लोणावळा दरम्यान थांबा नाही. पुणे-लोणावळा लोकलमध्ये इतर प्रवाशांना परवानगी नाही. त्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यानच्या शहरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसला खंडाळ्यानंतर दादरला थांबा आहे. त्यामुळे कल्याण व ठाणे येथे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यासाठी सिंहगड एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, जेणेकरून शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड येथील प्रवाशांची गैरसोय टळेल. दादर, कल्याण व ठाणे येथे जाणाऱ्यांची व इतर प्रवाशांची सोय होईल.
कामगार, दुधवाल्यांची परवडमुंबई व उपनगरांमध्ये कामासाठी जाणारे कामगार, कर्मचारी यांची परवड होत आहे. तसेच मावळ तालुक्यातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दूध घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे बंद असल्याने काही विक्रेत्यांना व्यवसाय बंद करावा लागला आहे.
गरीब प्रवाशांची होतेय फरपटशहरात मजूर, कामगार लाखोंच्या संख्येने आहेत. ते मावळात ये-जा करतात. तसेच मावळातून शहरातही मजूर, कामगार ये-जा करतात. त्यासाठी लोकलने ते प्रवास करतात. मात्र गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे पुणे-लोणावळा बंद करण्यात आली. अनलाॅक झाल्यानंतर सकाळी व सायंकाळी लोकलच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलला थांबा देण्यात आलेला नाही तसेच सामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील व मावळातील प्रवाशांना लोकलचा फायदा होत नाही.
पुणे-मुंबई दरम्यान सिंहगड व सह्याद्री एक्सप्रेस सुरू करणे आवश्यक आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांना मासिक पास उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्याबाबत निवेदनाव्दारे मागणीही केली आहे. - इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी-चिंचवड