पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले असून, वाहनचोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोलीस वाहनचोरांच्या शोधात आहेत. यातील पाच वाहनचोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच चोरीची वाहने त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. ‘वाहनचोर सुसाट, मास्टरमाईंड मोकाट’ असे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर प्रसिद्ध केले आहे. वाहनचोर मास्टरमाईंडचा शोध घेणे आवश्यक आहे. अजय आनंद भोसले (वय २०, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी, मूळ रा. तुगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि उल्हास विठ्ठल मोरे (वय २३, रा. फुगेवाडी, मूळ रा. जुळे सोलापूर) असे हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चिंचवड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. वाहन चोरीच्या एका गुन्ह्यातील आरोपी हिंजवडी येथील चौकात येणार आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी अजय भोसले आणि उल्हास मोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी कंपनीच्या गेट समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याबाबत युवराज बबन शिंगाडे (वय ३३, रा. आंबेगाव पठार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंगाडे हिंजवडी फेज दोन येथील कंपनीत नोकरी करतात. ७ आॅगस्ट रोजी ते सकाळी कंपनीत आले. त्यांनी त्यांची दुचाकी कंपनीच्या गेटसमोर पार्क केली. सायंकाळी पावणे सातला कामावरून कंपनीच्या बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले होते. आरोपी अजय आणि उल्हास यांनी पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी ४० हजारांच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे व तपास पथकातील कर्मचारी यांनी ही कामगिरी केली.
अल्पवयीन तीन मुले ताब्यातदुचाकीवरून आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना थांबवून चिंचवड पोलिसांनी त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, इम्पायर इस्टेट ब्रिजखालून दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. मौजमजा करण्यासाठी व फिरण्यासाठी खडकी, चतुश्रुंगी, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी येथून रिक्षा व दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. चोरी केलेल्या तीन रिक्षा व सहा दुचाकी असा तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला. चिंचवड, वाकड, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी, चतुश्रुंगी, खडकी या पोलीस ठाण्यांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल आहेत. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्नील शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, गोविंद डोके व अमोल माने यांनी केली आहे.