पिंपरी : घराला लागलेल्या आगीत घरगुती साहित्य खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासांच्या अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. चिंचवड येथे शाहूनगरमधील एमआयडीसीच्या जी ब्लाॅकमध्ये आर्यनम सोसायटीत सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहुनगर येथील आर्यनम सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार महापालिकेचे पिंपरी केंद्राचे, प्राधिकरण, तळवडे तसेच चिखली उप अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटमधून आगीचे लोळ व धुराचे लोट निघत होते. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत सोसायटीमधील इतर फ्लॅटमधील धूर कमी होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत किचनमधील दोन गॅस सिलेंडर बाहेर काढून खिडक्या व दरवाजे उघडून धुराची पातळी कमी केली. आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर कुलिंग करण्यात आले. घरामधील सर्व गृहउपयोगी वस्तू आगीमध्ये खाक झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. यात जिवित हानी किंवा कोणी जखमी झाले नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
अग्निशामक दलाचे शहाजी कोपनर, अमोल खंदारे, बाळासाहेब वैद्य, गौतम इंगवले, विकास नाईक, दत्तात्रय रोकडे, नवनाथ शिंदे, शाम खुडे, विशाल चव्हाण, जगदीश पाटील, विनायक बोडरे, संपत गौड, संजय महाडिक, अनिल माने यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.