रावेत : शहर परिसरात विविध ठिकाणी धोकादायकपणे फ्लेक्स उभे आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात अनधिकृतपणे फ्लेक्स उभे आहेत. चिंचवड, हिंजवडी, वाकड, रावेत, पुनावळे, मोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर धोकादायक सांगाडे उभे आहेत. रावेत धर्मराज चौक हा वर्दळीचा असून, येथून रावेत मार्ग, द्रुतगती मार्ग, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी प्राधिकरण, शिंदे वस्ती, इस्कॉन मंदिर परिसरातील महाविद्यालये आदी ठिकाणी जा-ये करण्यासाठी दररोज हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहने या चौकातून जात असतात.अभियांत्रिकी आणि फार्मास्युटिकल, पॉलिटेक्निक महाविद्यालय असल्याने येथे हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ असते.त्यामुळे हा चौक नेहमी गजबजलेला असतो. काही दिवसांपूर्वी या चौकातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अनधिकृत दुकाने, टपऱ्या अतिक्रमण विभागाने काढून चौक मोकळा केला. परंतु मुख्य चौकालगतच धोकादायक होर्डिंग का हटविले नाहीत, असा प्रश्न आहे.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकाही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग उभारण्यात आल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी उंचावरही होर्डिंग आहेत. ती गजबजलेल्या ठिकाणी असल्याने त्याच्याही सुरक्षेची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. होर्डिंगला कोसळू नये म्हणून योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही.जाहिरात होर्डिंगवर हवा आरपार जाण्याकरिता छिद्रे केली जातात पण या होर्डिंगवर तशी सोय नसल्यामुळे ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भविष्यात होणारा जीवघेणा अपघात टाळावा याकरिता प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. पुण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.वादळी वाऱ्याने उभारण्यात आलेले होर्डिंगचे खांब उन्मळून पडल्याची उदाहरणे आहेत. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र पावसाच्या पाण्याने होर्डिंगचे लोखंडी खांब गंजून ते खराब होतात. त्याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती नाकारता येत नाही.महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आकाशचिन्ह व परवाना विभागाने नोव्हेंबरमध्ये स्वतंत्र जाहिरात धोरण अर्थात जाहिरात होर्डिंग-आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग पॉलिसी तयार केलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लावण्यात येणाºया जाहिरात होर्डिंगसाठी यापुढे महापालिकेची परवानगी बंधनकारक असणार आहे.
फ्लेक्सच्या सांगाड्यांमुळे वाढला अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 2:37 AM