पुणे : अन्न धान्य वितरण केंद्रांवर आधार क्रमांक जोडणी आणि एईपीडीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी अनेक केशरी कार्डधारकांची नावे वगळली गेली. त्यामुळे त्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या फायद्यापासून वंचित राहावे लागत आहे. अशा जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख केशरी कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे पुन्हा शिधापत्रिका मिळवून स्वस्त दरातील धान्य घेता येईल.अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आमदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत याची घोषणा केली. आठवडाभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वस्त धान्याचा अपहार, बोगस शिधापत्रिकाधारक अशा समस्येमुळे गरजू व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ होत नव्हता. त्यामुळे शासनाने संपूर्ण शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडणी अनिवार्य केली. तसेच स्वस्त अन्न धान्य वितरण केंद्रावर ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या. परंतु, यातूनही पळवाट काढत धान्याचा अपहार करत असल्याचे समजल्याने शासनाने ई पॉस यंत्रणेबरोबरच एईपीडीएस यंत्रणा कार्यान्वित केली. दोन महिन्यांपासून ही यंत्रणा कार्यान्वित करताच योग्य व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत असून, धान्य बचत होत असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.केशरी कार्डधारकांच्या संख्येपैकी ग्रामीण भागात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपये असेल अशा ७५ टक्के नागरिकांना आणि शहरी भागात ज्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये असेल अशा ४५ टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल. त्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ मिळेल.प्रतिज्ञापत्राद्वारे मिळणार शिधापत्रिकानावे वगळल्या गेलेल्या शिधापत्रिकाधारकांना पुन्हाशिधापत्रिका मिळविण्यासाठी संबंधित परिमंडळ कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. त्यात, माझे उत्पन्न अन्नसुरक्षा योजनेनुसार असल्याचे नोंदवावे लागले. त्यासोबत संबंधित अर्जदाराची आधारकार्डची छायांकित प्रत आणि रहिवासी पुरावा घेतलाजाईल. त्याची पडताळणी केल्यानंतर संबंधिताला पुन्हा शिधापत्रिका वितरित करण्यात येईल.
केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा - पालकमंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:05 AM