पिंपरी: गेल्या १४ दिवसांपासून इंद्रायणीनदी फेसाळत आहे. मात्र, ही नदी कशामुळे फेसाळत आहे. याबाबतचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळाला लागले नाही, त्याबाबत पर्यावरणवादी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.लोणावळा जवळील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदीचा उगम होतो. मावळ, हवेली आणि खेड तालुक्यातून ही नदी वाहते. उगम ते तुळापूर संगम असे १०५ किलोमीटरचे नदीपात्र आहे. आळंदी देवाची येथील बंधाऱ्यापासून ३०० मीटर अंतरापर्यंत नदी फेसाळली आहे. चिंबळी, मोई, निघोजे या भागातील औद्योगिक परिसरातील पाणी थेटपणे सोडले जात आहे.शोध लागणार कधी?दोन जानेवारीपासून इंद्रायणी नदी फेसाळण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी केली. नगरपालिका प्रशासनाने पाहणी केली. पीएमआरडीए प्रशासनाने पाहणी केली. मात्र अजूनही नदी कशामुळे फेसाळत आहे, हे सापडत नाही. याबाबत इंद्रायणी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलेले आहे. त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ते दखल घेत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. इंद्रायणी नदीस फेस आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही सातत्याने प्रशासनाला माहिती देत आहोत. मात्र त्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आता तर इंद्रायणीच्या पाण्यात फेस आला आहे. तर उग्र वासही येत आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. नाहीतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.'
चौदा दिवसांपासून इंद्रायणी फेसाळतीये; प्रदूषण कुठून होतंय सापडेना
By विश्वास मोरे | Published: January 16, 2024 4:45 PM