चिंचवड : सध्या शहरातील अनेक खासगी शिक्षण संस्थांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. वर्ष संपण्यापूर्वीच पुढील वर्षाचे प्रवेश दिले जात आहेत. याचबरोबर शालेय साहित्य शाळेतूनच घ्यावे असा नियमच जणू या शाळांनी पालकांवर लादला आहे. बाजारभावापेक्षा जास्त दर आकारून शालेय साहित्य देण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. साहित्य घेण्यासाठी सक्ती केली जात असल्याने पालक संतप्त झाले आहेत. वारंवार असे प्रकार घडत असूनही अशा शिक्षण संस्थांवर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेमुळे शैक्षणिक संस्था विविध योजना राबवीत असल्याचे वास्तव शहरात दिसत आहे. विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी अनेक खासगी संस्था जाहिरातबाजीत व्यस्त आहेत. मात्र शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात असल्याने पालक संतप्त झाले आहेत. या बाबत शाळेचे धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे.शालेय साहित्य कसे असावे व त्याचा दर्जा या बाबत शाळा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे सांगत पालकांवर साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात आहे. या बाबत तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत. शालेय साहित्य पुरविणारी मंडळी व शाळा प्रशासन यांचे साटेलोटे असल्याने कमिशन मिळविण्यासाठी हा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत. याचबरोबर शाळेचा गणवेश कोणत्या दुकानातून घ्यावा, यासाठीही सक्ती केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली पालकांना सक्ती करून पैसे उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. अशा शिक्षण संस्थांवर कोणाचाही धाक नसल्याने शाळा प्रशासन मनमानी करीत असल्याचा आरोप पालक करीत आहेत. अशा प्रकारे लूट करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत.(वार्ताहर)खासगी संस्था : पैसा उकळण्याचा उपद्व्यापप्रवेश शिल्लक नसल्याचे सांगत अनेक खासगी शिक्षण संस्था पालकांना वेठीस धरत आहेत. अशा प्रकारात डोनेशनरूपी अतिरिक्त पैसा गोळा करण्याचा धंदा तेजीत आहे. प्रवेश दिल्यानंतर शालेय साहित्याची विक्री शाळेच्या आवारातच सुरु केली आहे. शाळेच्या नावाच्या वह्या, पुस्तके व इतर साहित्य चढ्या भावाने विकले जात आहे. हे साहित्य शाळेतूनच घ्यावे अशी सक्ती केली जात आहे. शाळेत मिळणारे साहित्य व बाजारात मिळणारे साहित्य यांच्या किमतीत तफावत असल्याने पालक असे साहित्य घेऊ इच्छित नाहीत. मात्र यासाठी सक्ती केल्याने पालक संतप्त झाले आहेत.
साहित्य खरेदीसाठी सक्ती
By admin | Published: April 01, 2017 1:49 AM