पिंपरी : व्याजापोटी २२ लाखांची मागणी केली. त्यानंतर जबरदस्तीने जागेच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तसेच वाहनांची परस्पर खरेदी विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली. चिंचवड येथे फेब्रुवारी २०२१ ते ३ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
बाळकृष्ण अंबादास पवार (वय ३५, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन तानाजी निंबाळकर (रा. चिंचवडगाव) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह शहाजी हनुमंत कवितके, हनुमंत कवितके (दोघे रा. चिखली), विजय वसंतराव ढुमे (रा. चिंचवडगाव) आण शहाजी कवितके याचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जुन्या चारचाकी वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. शहाजी कवितके त्याचे वडील हनुमंत कवितके आणि एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादीकडे व्याजापोटी २२ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला खलास करून टाकू, अशी आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली. फिर्यादीला त्यांच्या कार्यालयातून ओढून बाहेर नेत चारचाकी वाहनातून डांगे चौक येथे नेले.
आंबेठाण चाकण येथे असलेल्या ७० लाख रुपये किमतीच्या सात गुंठे जागेची इसार पावती आणि रिलीज डील दस्त तयार करून त्यावर जबरदस्तीने फिर्यादीला सही करण्यास भाग पाडले. विजय ढुमे याचे चारचाकी वाहन आणि सचिन निंबाळकर याचे चारचाकी वाहन ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादीने सर्व रक्कम देऊन त्यांच्या नावावर गाड्यांची डिलिव्हरी नोट तयार केली असताना शहाजी कवितके याने विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांना आर्थिक आमिष दाखवले.
विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांना कोणताही कायदेशीर हक्क नसताना फिर्यादीच्या परस्पर तेच गाड्यांचे मूळ मालक असल्याचे भासवून त्यांच्या संमतीने आरटीओ कार्यालयाची दिशाभूल करून व खोटे कागदपत्रे सादर करून त्या गाड्या शहाजी कवितके याच्या नावावर ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम व फसवणूक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.