चिंचवड : काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (दि. ४) रात्री साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथील तानाजीनगरमध्ये घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला.
गणेश घोलप, आकाश घोलप (रा. तानाजीनगर, चिंचवड) व सुमित लव्हे (रा. काळेवाडी, पिंपरी) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या गाडीतून चिंचवड येथे गेले होते. तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळाजवळ आले असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडविले. तसेच त्यांना मोटारीबाहेर खेचून धारदार शस्त्राने त्यांच्या हातावर, तोंडावर व डोक्यावर वार केले. त्यामध्ये लोंढे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश घोलप, आकाश घोलप, सुमित लव्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढे यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच हल्लालोंढे यांचा ५ एप्रिलला वाढदिवस असतो. दर वर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.