लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : इतिहासाची साक्ष देत उभ्या असणाऱ्या मावळातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य हुल्लडबाज पर्यटकांकडून भंग केले जात असल्याने शिवभक्त, तसेच गडप्रेमींकडून याचा नेहमीच निषेध होताना दिसत आहे. हुल्लडबाजांना आळा घालण्यासंबंधीचे निवेदन छत्रपती नेटवर्क मावळ या संघटनेकडून पुरातत्त्व विभागाला देण्यात आले आहे.मावळ तालुक्यातील निसर्ग पुण्या-मुंबईच्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो. पावसाळ्याच्या हंगामात तर मावळला विशेष पसंती मिळत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये येथे पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. मावळात लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग, कोरीगड, राजमाची, ढाकभैरी आदी गड-किल्ल्यांसह कार्ला, भाजे, बेडसे, उकसान, पाले आदी लेण्या आहेत. पवना, वडिवळे, शिरोता, आंद्रा आदी धरणे आहेत. याशिवाय नाणे, पवन व अंदर मावळासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्राचीन मंदिरे व नयनरम्य धबधबे व त्यातून फेसाळणारे पाणी पहावयास मिळतात. लोणावळ्यासारखे थंड हवेचे ठिकाण मावळात असल्याने येथे पर्यटकांचा कायम ओढा असतो.मात्र काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था होत असून, गड-किल्ल्यांवर होणाऱ्या बीभत्स, ओंगळवाण्या प्रकारामुळे या ऐतिहासिक वास्तूंची विटंबना होत असल्याची तक्रार मावळप्रेमी, गड संवर्धनाचे कार्य करणारे शिवप्रेमी व मावळवासीयांकडून सातत्याने होताना दिसत आहे. पण याकडे भारतीय पुरातत्त्व विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप संबंधितांकडून केला जात आहे.छत्रपती नेटवर्क मावळ या युवकांच्या संघटनेने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहगडावरील त्र्यंबक तलावात पुरातत्त्व विभागाचे नियम धाब्यावर बसवून पर्यटक पोहतात. तसेच काही महिन्यांपूर्वी शिवभक्तांनी कठोर मेहनत घेऊन गडाखाली असलेल्या तोफा गडावर व्यवस्थित लावल्या होत्या. त्याही विखुरल्या आहेत. मोठ्या आवाजात गाणी लावून पर्यटक अचकट-विचकट हावभाव करीत नाचतात. प्रेमी युगलांचे अश्लील चाळे वाढत असून, याकडे लक्ष नसल्याने गडांचे पावित्र्य भंग होत आहे.
गड-किल्ल्यांवरील हुल्लडबाजांना आवरा!
By admin | Published: July 14, 2017 1:53 AM