पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. २०६ पिंपरी विधानसभेतील मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून मतदारांना नोटीस बजावून त्यांचे जबाब, पंचनामे करुन छाननी सुरु आहे. या बाबतचा प्रस्ताव बुधवारी सर्वसाधारणसभेत आयत्यावेळी दाखल केला.विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांनी मतनोंदणी अभियान मोठया प्रमाणावर राबविली होती. दोन वर्षांपूर्वी चिंचवडमधील सुमारे पंधरा हजार मतदार वगळण्यात आले होते. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या १० मे २०१८ नुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण ३९९ यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरु आहे. नवीन पुनर्निरीक्षण कार्यक्रमामुळे बोगस मतदार सापडण्यास मदत होणार आहे. तसेच मतदार यादीही अद्ययावत होणार आहे. स्थलांतरित, दुबार सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या असून प्राप्त पंचनामे यांची छाननी करुन पहिल्या टप्प्यात यादीनुसार ४ हजार ६४५ मतदार वगळण्यास पात्र केले आहेत.याबाबत त्या मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी -चिंचवड महापालिका या तिन्हीही वेबसाईटवर अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. या वगळणी कार्यक्रमाचा व्यापक प्रसिध्दीचा भाग म्हणून प्रस्तावित वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवली आहे.
पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 6:19 PM
पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे.
ठळक मुद्देहे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरुनवीन पुनर्निरीक्षण कार्यक्रमामुळे बोगस मतदार सापडण्यास मदत होणार