पिंपरी : ताथवडे येथील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणातील चालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली. वाकड पोलिसांनी बुधवारी (दि. ११) माण येथे ही कारवाई केली. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या सात झाली.
टँकर चालक मोहमद रशीद नसीम (३४, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), मुकेश बद्रीराम देवासी (२६), प्रेमाराम सियाराम मेघवाल (४९), गोवर्धन भीमसेन राजपूत (२८, सर्व रा. ताथवडे, मूळ रा. पाली, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी यापूर्वी महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुल कुमार राज देवराम (रा. थेरगाव) आणि चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) या संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपसात संगणमत करून संशयितांनी रविवारी (दि. ८) रात्री ताथवडे येथे टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून सिलिंडरमध्ये भरत होते. त्यावेळी गळती होऊन आग लागल्याने नऊ सिलिंडरचे स्फोट झाले. दरम्यान, वाकड पोलिसांनी घटनेनंतर २४ तासाच्या आत जागामालकासह तिघांना अटक केली. त्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टँकर चालकासह चौघांना बुधवारी अटक केली.
दरम्यान, सिलिंडर स्फोट प्रकरणातील गॅस टँकर शिक्रापूर येथील बीपीसीएल यार्डमध्ये हलवला आहे. तसेच, जळालेली अन्य वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गॅस टँकर बाबतीत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.