चिंचवड - चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचवड गावातील चापेकर चौकाजवळ वेताळनगर भागात रस्त्याच्या कडेला साफसफाई करणाऱ्या एका महिलेला चार लोखंडी वस्तू पडल्याचे निदर्शनात आले. बॉम् सारख्या दिसणाऱ्या या वस्तू असल्याने त्यांनी यााबाबतची माहिती चिंचवड पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या वस्तूंची पाहणी करून पोलिसांनी हे बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या रिक्षाच्यामागे अडगळीच्या ठिकाणी चार लोखंडी बॉम्ब सदृश्य वस्तू पडल्याची घटना उघड झाली. आकाराने लांब व गोलाकार दिसणाऱ्या या वस्तू बॉम्बसदृश्य असल्याने हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या वस्तूंपासून नागरिकांना दूर हटविण्यात आले.
बॉम्ब सदृश्य असणाऱ्या या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे हे या वस्तू वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत घेऊन आले. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले.याची पाहणी केल्यानंतर हे जुने निकामी झालेले बॉम्ब असल्याचे उघड झाले.या पाहणीनंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र हे बॉम्ब या भागात कसे आले याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत. शहरात अनेकदा अशा प्रकारच्या बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याचा घटना घडल्या आहेत. जुन्या लोखंडी गंज लागलेल्या या वस्तू बेवारस प्रकारे आढळून येत असल्याने या वस्तू येतात कशा असा सवाल उपस्थित होत आहे.