पिंपरी - अचानक लागलेल्या आगीत बांधकाम मजुरांच्या चार झोपड्या खाक झाल्या. तसेच झोपड्यांमधील चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे रहाटणी परिसर हादरला. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील तापकीर मळा चौक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पालगत मोकळ्या जागेत बांधकाम मजुरांच्या झोपड्या आहेत. या झोपड्यांमधील मजूर बांधकामावर असताना शनिवारी सायंकाळी झोपड्यांना अचानक आग लागली. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील एक आणि थेरगाव उपकेंद्रातील एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या १४ जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आगीत चार झोपड्या खाक झाल्या. झोपड्यांमधील घरगुती साहित्याचे नुकसान झाले. या झोपड्यांमध्ये सात गॅस सिलेंडर होते. त्यातील चार सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. तसेच आगीचे लोळ आणि धुराचे लोट निघत होते. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
जीवितहानी टळली
बांधकाम मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या या लेबर कॅम्पमधील काही जण गावाकडे गेले आहेत. तसेच उर्वरित मजूर हे कामावर होते. त्यामुळे आग लागली त्यावेळी झोपड्यांमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली.