पिंपरी : शहरात चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यात देहूरोड आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक तर चाकण येथील मेदनकरवाडी व नाणेकरवाडी येथे अपघात झाले. यात चारचाकी वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच दोन पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. २४) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देहूरोड येथील अपघात प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक विश्वनाथ बांगर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड येथे रेल्वे ब्रिजजवळ शनिवारी (दि. २३) रात्री कंटेनरने चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यात चारचाकी चालक प्रतीक शिरीष हिरवे (वय २९, रा. रास्ता पेठ, पुणे) यांचा मृत्यू झाला. याबाबत कंटेनर चालक मांगीलाल मोहनलाल उर्फ मोहनराम खिचड (वय ३३, रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मोरवाडी येथे झालेल्या अपघात प्रकरणी अर्जुन किसन बिस्ट (वय ३५, रा. देहूरोड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका दुचाकीने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. तसेच धडक देणाऱ्या दुचाकीवरील मागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला.
मेदनकरवाडी येथील अपघातात विशाल पांडू चाैरे (वय २५) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत छोटीराम बोवाजी कोकणी (वय २९, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल हा रस्त्याने पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात विशाल यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला.
नाणेकरवाडी येथील अपघातात ग्यान बहादूर जोगराज मडई असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहन धरमसिंग भोहरा (वय २५, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश नामदेव पवार (रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरून रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोने ग्यान बहादूर यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.