वडगाव मावळ : येत्या २१ फेबु्रवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकूण सहा अर्ज दाखल करण्यात आले.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार, तर पंचायत समितीसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चार आणि कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून वाकसई-कुसगाव गटासाठी कुसुम ज्ञानेश्वर काशीकर यांनी अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी अर्ज दाखल केला. वडगाव-खडकाळा गटासाठी सर्वसाधारण जागेसाठी बाबूराव आबाजी वायकर यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब रामचंद्र शिंदे आणि कॉँग्रेसकडून रोहिदास दशरथ वाळुंज यांनी अर्ज दाखल केला आहे. पंचायत समिती वाकसई गणासाठी अनुसूचित जमाती या जागेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीकडून महादू हरी उघडे यांनी, तर कुसगाव बुद्रुक सर्वसाधारण स्री जागेसाठी राष्ट्रवादीच्या राजश्री संतोष राऊत यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा शेवटच्या दिवशी आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. तर कॉँग्रेस रविवारी आपल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. सुटीच्या दिवशीही उमेदवारीअर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. (वार्ताहर)
जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल
By admin | Published: February 05, 2017 3:24 AM