पिंपरी : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असून, कारवाई करण्यासाठी आल्याचे सांगणाऱ्या चार तोतयांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तळवडे येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
रणजित धोंडिबाराव भोसले (वय ५४, रा. चऱ्होली फाटा, आळंदी रोड), संजय श्रीशैल मल्लाड (वय ३४, रा. मोशी प्राधिकरण), राम नारायण सुर्वे (वय ५०, रा. शिवतेज नगर, चिखली), प्रदीप देवराम मालकर (वय ३६, रा. रुपीनगर, तळवडे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी संतोष शिवाजी जाधव यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
लोकसेवक नसतानाही आरोपी हे तोतयेगिरी करून तळवडे येथील हुमा बेकरी येथे गेले. आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असून, कारवाई करण्यासाठी आलो आहोत, असे आरोपी यांनी सांगितले. बेकरीतील काऊंटरवरील फैजल हमीद अन्सारी (वय २५) यांना अधिकारी असल्याचे भासवून आरोपी यांनी बेकरीतील मालाची तपासणी सुरू केली. ब्रेड पॅकेटवर तारीख टाकलेली नाही व बेकरीतील काही पदार्थ पॅकबंद नाहीत, असे सांगून अन्सारी यांना भिती घातली. कारवाई न करण्यासाठी पावती करा किंवा पैशांची सेटलमेंट करा, असे आरोपी यांनी सांगितले.
आरोपी यांचा संशय आल्याने बेकरीचालकाने पोलिसांना फोन केला. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांची तोतयेगिरी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली.