पिंपरी : चार दुकाने आगीत भस्मसात झाली. आगीत कोणीही जखमी झाले नाही. विकासनगर किवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत मंगळवारी (दि. २०) रात्री पावणे बारावाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत असलेल्या दुकानांना आग लागल्याची माहिती मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पिंपरी - चिंचवड अग्निशामक मुख्यालयातून तीन, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रातून एक, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राचा एक आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या दुकानांचे शटर कुलूपबंद होते. त्यामुळे पावर कटर मशीनने शटर कट करण्यात आले. आगीवर होज व होज रील होजच्या साह्याने पाणी मारून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत पीजीडी कम्प्युटर्स, श्री दुर्गा प्रोव्हिजन, ओम गणेश इंटरप्रायझेस आणि श्री लक्ष्मी केरला स्टोअर आणि हॉटेल ही दुकाने भस्मसात झाली. या आगीत ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संपत गौंड, सारंग मंगरूळकर, संजय महाडिक, रुपेश जाधव, लक्ष्मण बंडगर, अनिल माने, श्रीहरी धुमाळ, प्रशिक्षणार्थी फायरमन शिवाजी पवार, गौरव सुरवसे, सिद्धेश दरवेश, किरण राठोड, राज शेडगे, प्रतीक आहीरेकर, राहुल कराडे, अनिल गोसावी, परमेश्वर दराडे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.