लोणी काळभोर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोरमध्ये रविवारी (१२ जुलै) तर यवत येथे सोमवारी (१३ जुलै) मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची सुविधा नसल्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर लोणी काळभोर (ता. हवेली) व यवत (ता. दौंड) येथे फायबरची चारशे तात्पुरती; परंतु अत्याधुनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे शहराचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी दिली. पथदर्शी प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी लोणी काळभोर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. या वेळी रावत बोलत होते. याप्रसंगी अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केशव आबा काळभोर, हवेली पंचायत समितीच्या सदस्या रत्नाताई भोसले, सरपंच भोलेनाथ शेलार, उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, माजी उपसरपंच प्रशांत काळभोर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूकाका काळभोर, जिल्हा उपाध्यक्ष संदेश काळभोर, युवानेते प्रवीण काळभोर, चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच शालिवाहन काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळभोर, सुभाष काळभोर, सुनीता गायकवाड, शिवसेनेच्या हवेली तालुका महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा कदम,कौशल्या राऊत, रेखा गायकवाड ग्रामविकास अधिकारी पी. बी. गळवे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माहिती देताना माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले, की लोणी काळभोर व यवत येथे प्रायोगिक तत्त्वावर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या सर्व नोंदी ठेवण्यात येणार आहेत. (वार्ताहर)------------या प्रकल्पात शासनाची एक रुपयाचीही मदत घेतलेली नाही. शासनाच्या मदतीशिवाय हा प्रकल्प यशस्वी करण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाने पुढील वर्षी सर्व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हा प्रकल्प राबवावा, म्हणून आग्रह धरण्यात येणार आहे. ४पालखी मुक्कामी येण्याच्या दोन दिवस अगोदर ही सर्व शौचालये तयार करून ठेवण्यात येणार आहेत. लोणी काळभोर व यवत येथे प्रत्येकी दोनशे अशी चारशे शौचालये तयार करण्यात येणार आहेत. महिला व पुरुष असे दोन विभाग करण्यात येणार आहेत.
फायबरची चारशे शौचालये उभारणार
By admin | Published: July 06, 2015 4:09 AM