पिंपरी : वाहन चालविण्याच्या हौसेपायी चार दुचाकींची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार लाख ५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सांगवी पोलिसांच्या वाहन चोरी प्रतिबंधात्मक पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या स्तरावरील वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलीस कर्मचारी अरुण नरळे व नितीन खोपकर गुरुवारी (दि. ६) सायंकाळी गस्त करीत होते. त्यावेळी साडेपाचच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, एक अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी वापरत आहे. त्यानुसार कृष्णा चौक, नवी सांगवी येथे सापळा रचून पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. तसेच त्याने आणखी दुचाकी चोरल्याचे तपासात सांगितले. सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या चार लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी या अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. मला वेगवेगळ्या दुचाकी चालविण्याची हौस असल्याने चार दुचाकींची चोरी केली, असे त्याने तपासात सांगितले आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी कैलास केंगले, सुरेश भोजणे, चंद्रकांत भिसे, नितीन दांगडे, रोहिदास बोहाडे, अरुण नरळे, नितीन खोपकर, विनायक देवकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोडा यांनी ही कारवाई केली आहे.
वाहन चालविण्याच्या हौसेपायी अल्पवयीन मुलाने चोरल्या चार दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 1:07 PM
चार लाखांच्या दुचाकी जप्त
ठळक मुद्देवाहन चोरी प्रतिबंधात्मक पोलिसांची कारवाई