पिंपरी : वाहनचोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी पथके तयार करून चार वाहनचोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून १० लाख ५५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या २५ दुचाकी जप्त केल्या. वाहनचोरीचे २५ गुन्हे उघडकीस आले आहेत. भोसरीपोलिसांनी ही कामगिरी केली.
अजित अमृता साबळे (वय २५, रा. मवेशी, पो. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह इतर तीन विधीसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे प्रकार वाढल्याने वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांची दोन तपास पथके नियुक्त केली. गाढवे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी चेतन साळवे यांना माहिती मिळाल्यानुसार, पोलिसांनी वाॅच ठेवून विधीसंघर्षित बालकासह आरोपी साबळे यांना ताब्यात घेतले. भोसरी, पिंपरी, चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक परिसरातून चोरलेल्या १८ महागड्या दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या. यातील ११ दुचाकी आरोपी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले परिसरात ठेवल्या होत्या. तेथून त्या दुचाकी जप्त करून एकूण १७ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकाने शनिवारी (दि. २६) विधीसंघर्षित असलेल्या दोन बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या. तसेच पाच गुन्हे उघडकीस आणले.
भोसरी, सांगवी, चाकण, चिखली, विश्रांतवाडी, खडक, नारायणगाव, आळेफाटा, अकोले, संगमनेर, राजूर (अहमदनगर), घोटी (नाशिक), कोथरूड तसेच इतर हद्दीतून चोरलेल्या १० लाख ५५ हजारांच्या २५ दुचाकी जप्त करून २५ गुन्हे उघडकीस आणले.
वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, नामदेव तलावडे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत तिटकारे, अजय डगळे, गणेश हिंगे, बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले, चेतन साळवे, अशोक ताथवडे, संतोष महाडीक, समीर रासकर, आशिष गोपी, सुमीत देवकर, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.