पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मंगळवारी मतदान होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने एका मतदाराला एकाच वेळी चार मते द्यावी लागणार आहेत. महापालिका सभागृहात एकूण ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा अ, ब, क, ड अशा चार जागांचा एक प्रभाग असून, मतदाराला एकाच वेळी चार जागांसाठी मतदान करायचे आहे. अ जागेसाठी सफेद रंग, ब जागेसाठी फिकट गुलाबी, क जागेसाठी फिकट पिवळा, तर ड जागेसाठी फिकट निळा रंग असेल. प्रभागातील प्रत्येक जागेसाठी शेवटचे बटण वरीलपैकी कोणी नाही अर्थात ‘नोटा’ यासाठी असेल. उमेदवारांपैकी कोणालाही मतदान करायचे नसल्यास हा ‘नोटा’चा पर्याय असून, त्या ठिकाणचे बटण दाबता येऊ शकते. चार मते दिल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी १६०८ मतदान केंद्रांवर पाच हजार ५३ बॅलेट युनिट असून, एक हजार ७७२ कंट्रोल युनिट असतील. ३२ प्रभागांतून १२८ जागांसाठी एकूण ७७३ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे मतदान यंत्रेही जास्त प्रमाणात लागणार आहेत. (प्रतिनिधी)
एका मतदाराला चार मतांचा अधिकार
By admin | Published: February 20, 2017 2:47 AM