पिंपरी : शॉर्टसर्किट झाल्याने गाडीतून अचानक धूर निघाल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. ही बाब लक्षात आल्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून चालक बाहेर निघाला. त्यानंतर काही क्षणांतच पेट घेऊन गाडी जळून खाक झाली. थेरगाव येथे बीआरटी मार्गावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
काळेवाडी येथील तापकीर चौकातून चिंचवडच्या दिशेने एक चारचाकी वाहन जात होते. त्यावेळी थेरगावच्या ‘एमएम’ चौकात गाडीतून अचानक धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. ही बाब वाहनचालकाच्या लक्षात आली. त्याने रस्त्याच्या कडेला वाहन थांबविले व तो गाडीतून बाहेर आला. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच रहाटणीतील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर काही वेळातच आग विझविण्यात यश आले. वाहतूक पोलीसही तत्काळ दाखल झाले होते. कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी वाहतुकीचे नियोजन केले.
आगीचे लोळ व धुराचे लोटसंबंधित वाहनमालकाने ही गाडी नुकतीच खरेदी केली होती. नवीन गाडी असून त्यात काही किरकोळ तांत्रिक बिघाड असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे गाडी ‘शोरुम’मध्ये नेण्यात येत होती. त्याचवेळी शॉर्ट सर्किट होऊन गाडीने पेट घेतला. त्यानंतर आगीचे लोळ व मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते. त्यामुळे येथील नागरिक व वाहनचालकांमध्ये घबराट होती. या वेळी बघ्यांनी गर्दी केली होती.