पिंपरी : वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लू पुन्हा बळावला आहे. या महिन्यात स्वाइन फ्लूमुळे चार बळी गेले आहेत. यात तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यामुळे या वर्षातील बळींची संख्या ३६ वर गेली आहे. शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये एकून १७ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. एप्रिल महिन्यानंतर स्वाइन फ्लू कमी झाला होता. जुलैपर्यंत एकही रुग्ण शहरात आढळून आला नाही. मात्र आॅगस्ट महिन्यात पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य अधिकाऱ्यांना यश आले आहे. स्वाइन फ्लूवर मात्र अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे दिसत आहे. ऊन-पाऊस, हवेतील गारवा, ढगाळ वातावरण यामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. असे असतानाही लोक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत नसल्याचे दिसून येत आहे. थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असूनसुद्धा मास्कचा वापर होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचा महिन्यात चौथा बळी
By admin | Published: August 24, 2015 3:00 AM