पिंपरी : जागेच्या व्यवहारात ९९ लाख ३५ हजार रुपये घेऊन नोटरी करारनामा केला. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास तयार असूनही खरेदीखत न करता काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाची फसवणूक केली. पिंपरी येथील खराळवाडी येथे जानेवारी २०१५ ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
सद्गुरू महादेव कदम (वय ५०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २२) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशोक रामेश्वर गोयल (वय ७०) आणि समीर अशोक गोयल (वय ४०, दोघेही रा. इंद्रायणीनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी कदम यांना खराळवाडी येथील इमारतीपैकी तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम व त्यावरील संपूर्ण टेरेस विकत घेण्यासाठी ९९ लाख ३५ हजार रुपये आरोपी यांना दिले. त्यानुसार आरोपींनी नोटरी करारनामाही करून दिला. फिर्यादी हे उर्वरित १० लाख ६५ हजार रुपये देण्यास तयार असतानाही आरोपींनी खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करीत फिर्यादी कदम यांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.