पिंपरी : फेसबुक, व्हॉटसअॅपवर मैत्री वाढवून पुण्यात सराफी दुकान सुरु करुन ते चालविण्यास देतो असे आमिष दाखवून एकाची ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव लक्ष्मण खांडेकर (वय ५४, रा. फ्लॅट नं. १२ श्रीनाथजी हाईटस, पूर्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लुईस क्रिस्तोफर व सोनिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी खांडेकर यांच्यासोबत फेसबुक व व्हॉटसअॅपवर मैत्री वाढविली. त्यानंतर पुण्यात सराफी दुकान सुरु करुन ते चालविण्यास देताे, असे आमिष आरोपींनी खांडेकर यांना दाखविले. तसेच लुईस क्रिस्तोफर ही दिल्ली येथे आली असून तिच्या कस्टमच्या डॉक्युमेंटेशनसाठी, कस्टम क्लिअरन्ससाठी तसेच फायनान्स मिनिस्ट्री क्लिअरन्ससाठी ७ लाख १ हजार ६५७ रुपये लागतील, असे सोनिया हिने खांडेकर यांना सांगत त्यांच्या वेगवेगळया अकाऊंटवरुन ७ लाख १ हजार ६७५ रुपये काढून घेतले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खांडेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.