पिंपरी : कच्च्या मालाची डी कॉयलिंग अॅन्ड शेअरिंग प्रक्रिया करून देतो, तसेच अतिरिक्त कच्च्या मालाचा साठा विक्री करून देतो, असे आमिष दाखवुन आरोपींनी संगनमताने बनावट चलन तसेच बीले तयार करून उद्योजकाची ९४ लाख ८० हजार २८५ रुपयाची फसवणुक केली आहे. अशी फिर्याद चिखली पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. तीन आरोपींविरोधात चिखली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर जगन्नाथ बराडे (वय ५३, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. देहु आळंदी रस्ता चिखली येथे सप्तसतिज इंडस्ट्रिज या नावाने त्यांचा उद्योग आहे. प्रकाश पारेकर, निखिल दत्ता लवटे, प्रमोद बिरादार या आरोपींविरोधात फिर्यादीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी उद्योजकाला कच्च्या मालाची डी कॉयलिंग अॅन्ड शेअरिंग प्रक्रिया करून देतो,असे सांगितले. अतिरिक्त कच्च्या मालाचा साठा विक्री करून ६० दिवसात त्याची रक्कम देतो असे आश्वासन दिले. कंपन्यांची खोटी नावे सांगून बनावट चलन, बीले बनवण्यास भाग पाडले. मालाची प्रक्रिया न करता, कच्चा माल विक्रीची रककम परत केली नाही. सुमारे ९४ लाख ८० हजार २८५ रुपयांची आर्थिक फसवणुक केली. चिखली पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.