पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. अंतर्मना पी. व्ही. ग्रेनाईट व अंतर्मना टाईल्स, पुणे-बेंगळुरू महामार्गालगत बावधन येथे २०१९ ते २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
सीताराम हाथीराम चौधरी (वय ३६, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १६) फिर्याद दिली आहे. विनोदकुमार पारसमल जैन (पाटणी) (रा. बावधन), प्रकाश गुजर, राजेश, पुणे पिपल्स को. ऑप. बँक लि. या बँकेच्या कोथरूड शाखेचा सेवानिवृत्त व्यस्थापक महेश प्रभाकर केंकरे व त्या बँकेचे तत्कालीन सेवक श्री स्वप्नील राक्षे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोदकुमार जैन याने फिर्यादीला अंतर्मना पी. व्ही. ग्रेनाईट व अंतर्मना टाईल्स या फर्मच्या नावे ३३ गुंठे जागा भाड्याने घेण्यास व तेथे ग्रेनाईट विक्रीचा व्यवसाय करण्याचे सांगितले. त्यासाठी ३२ लाख रुपये गुंतवूणक करण्याचा भरवसा दिला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून भागीदारीत व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीच्या स्वत:च्या मालकीच्या अंतर्मना टाइल्स या फर्मच्या पुणे पिपल्स को. ऑप. बँकेच्या कोथरूड शाखेतील खात्याच्या माहितीत फेरफार केला. त्यासाठी आरोपी विनोदकुमार याने आरोपी केंकरे व राक्षे यांच्याशी संगनमत केले. फिर्यादीच्या बँक खात्याचा नंबर बदलून आरोपी विनोदकुमार याचा मोबाइल नंबर आरोपी केंकरे आणि राक्षे यांनी नोंद करून घेतला. त्यानंतर त्या फर्मच्या बँक खात्यातून ८२ लाख २८ हजार ८२ रुपयांचा आरोपींनी आर्थिक गैरव्यवहार केला. अंतर्मना टाईल्स या फर्मच्या ३४ लाख आठ हजार ६४० रुपयांच्या मालाचा स्टॉक असताना आरोपी विनोदकुमार याने फिर्यादीच्या फर्मवर अतिक्रमण करून कब्जा केला. विश्वासघात करून फिर्यादीचे एक कोटी ४८ लाख ३६ लाख ७२२ रुपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या सह्या असलेले धनादेश तसेच इतर धनादेशांवर बनावट सह्या करून आरोपीने धनादेशांचा गैरवापर करून आर्थिक नुकसान केले. अंतर्मना पी. व्ही. ग्रेनाईट व अंतर्मना टाईल्स या दोन्ही फर्म आरोपी विनोदकुमार याने स्वत:च्या ताब्यात घेतल्या. फिर्यादी हे फर्मच्या ठिकाणी गेले असता आरोपी विनोदकुमार, प्रकाश गुजर, राजेश यांनी फिर्यादीला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.