पुणे : ‘तो’ बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या नावाचा लोगो आणि शिक्क्याचा वापर करून बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करायचा. येरवडा व लोहगाव भागात हे बनावट पेपर पियाजो, बजाज ऑटो रिक्षा, टुरिस्ट, कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांच्या मालकांना कमी पैशात आर.टी ओ पासिंगसाठी द्यायचा. त्यातील एक बनावट इन्शुरन्स पॉलिसीची प्रत पोलिसांच्या हातात मिळाली.
कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर ती बनावट असल्याचे सिद्ध झाले. बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर घेऊन दुचाकीवरून जात असतानाच 'तो' पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्या गाडीच्या डिक्क्कीत एकूण ३४ बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे एकूण ६ लाख ३२ हजार ९४२ रूपयांचे बनावट पेपर हस्तगत करण्यात आले. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा २ ने ही कारवाई केली.
संतोष विठठल शिंदे (वय ४७ रा.स,नं १०३ बुधविहार जवळ, गांधीनगर येरवडा व पवार वस्ती लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी व पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व इतर कर्मचा-यांना संतोष शिंदे हा 1 सप्टेंबरला रोजी येरवडा भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसीचे बनावट पेपर्स सापडले, कंपनीच्या अधिका-यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीच्या राहत्या घरी बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करण्याकरिता वापरात येणारे लँपटॉप, प्रिंटर, शिक्के, स्टँम्प पँड व कोरी कागदे आदी ३२ हजार ५०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी याने या कामाकरिता कोणाची मदत घेतली आहे का? त्याने यापूर्वी किती लोकांना अशा पद्धतीने बनावट इन्शुरन्स पेपर वाटप केले आहे. त्याबाबत तपास चालू आहे.