पिंपरी : नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेऊन २० गुंठे जमिनीची विक्री केली. मुळशी तालुक्यातील महाळुंगे तसेच चिंचवड येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे १५ डिसेंबर २०२१ ते २५ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. जमीन विक्री करणाऱ्यांसह, खरेदीदार, साक्षीदार यांच्या विरोधात याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सलीम नूर मोहम्मद पीरजादा (वय ६३, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १९) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सलीम नूर मोहम्मद पीरजादा, हसीना सलीम पीरजादा (दोघे रा. मुंढवा, पुणे), भुरानी मोहम्मद रजाक इमदाद अली (रा. कोंढवा खुर्द, पुणे), एस. एन. शिंदे (रा. निगडी), आर. आर. कुले (रा. कोल्हेवाडी, पुणे), विक्रम साळुंखे (रा. पिंपळे गुरव), विक्रम भाट (रा. भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुळशी तालुक्यातील महाळुंगे येथे २० गुंठे जमीन आहे. आरोपी सलीम आणि हसीना यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावाशी असलेल्या साधर्म्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीच्या २० गुंठे जमिनीचे खोटे, बनावट दस्त केले. त्यावर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या बनावट सह्या करून ती जमीन आरोपी भुरानी यांना विक्री केली.
या बनावट खरेदीखतावर आरोपी एस. एन. शिंदे यांनी साक्षीदार म्हणून तर आरोपी विक्रम साळुंखे व विक्रम भाट यांनी ते सलीम, हसीना आणि भुरानी यांना व्यक्तिशः ओळखत असल्याबाबत ओळख पटवून सह्या केल्या. आरोपी भुरानीने बनावट दस्ताचा वापर करून फिर्यादीच्या मालकी क्षेत्रावर त्यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांच्या जागेत लावलेला बोर्ड काढून टाकून जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.