पिंपरी : मुलाची बाबा गाडी ओएलएक्सवर विक्री करणे मिलिटरीच्या मेजरला चांगलेच महागात पडले. तुम्हाला पैसे पाठवितो, असे सांगून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्यातून 19 हजार 508 रुपये डेबीट करून फसवणूक केली. पिंपळे गुरवर येथे गुरुवारी (दि. 26) सकाळी दहा ते पावणेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी दौलत संपतराव बोरकर (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहारुना ऐसुब (रा. भाटपूर, राजस्थान) व मोकम निरनसिंग आदिवासी (रा. खैरा, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बोरकर मिलीट्रीत मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाची प्राम (बाबागाडी) विक्रीसाठी त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्यानंतर आरोपींनी फियार्दी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आम्ही तुम्हाला पैसे पाठवितो असे सांगितले. तुम्हाला क्यूआरकोड पाठविला आहे, तो स्कॅन करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील, असे आरोपींनी सांगितले. त्यानंतर फियार्दी यांनी कोड स्कॅन केला असता, त्यांच्या बँक खात्यातील 19 हजार 508 रुपये डेबिट झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.