पिंपरी: बनावट कागदपत्र तयार करून फ्लॅटची विक्री करून बांधकाम व्यावसायिकाची पाच कोटी २५ लाख २५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकांसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड येथे ४ डिसेंबर २०१९ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
संजय पांडुरंग कलाटे (वय ४२, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जयंत वल्लभदास कनेरिया (रा. पाषाण), धिरजलाल गोरधनदास हंसालिया, अजय बिपीनचंद जव्हेरी, धरती अजय जव्हेरी (तिघेही रा. बाणेर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी जयंत कनेरिया आणि धिरजलाल हंसालिया हे माऊंट वर्ट असोसिएट या फर्मच्या बांधकाम व्यवसायामध्ये भागीदार आहेत. आरोपी जयंत कनेरिया आणि धिरजलाल हंसालिया यांनी आरोपी अजय जव्हेरी व धरती जव्हेरी यांच्याशी संगनमत करून एकूण १६ फ्लॅटचे बनावट कागदपत्र तयार केले. त्यावर फिर्यादीची सही न घेता ते फ्लॅट आरोपी अजय आणि धरती यांना कमी किमतीमध्ये म्हणजेच १० कोटी ५५ लाख रुपयांना विक्री केले. त्याची पूर्ण रक्कम फर्मच्या नावे जमा करणे आवश्यक असताना सहा कोटी ३२ लाख ४४ हजार २५० रुपये जमा केले. तसेच उर्वरित रक्कम चार कोटी २२ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा आरोपींनी अपहार करून फसवणूक केली. आरोपी अजय आणि धरती यांनी तुटपुंज्या किमतीला मिळालेल्या सदनिका त्रयस्थ इसमांना वाढीव किमतीला विकून त्यातून एक कोटी दोन लाख ७० हजार रुपये बेकायदेशीररित्या नफा कमाविला. आरोपींनी संगनमत करून स्वत:च्या आर्थिक लाभापोटी बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीची सही व मान्यता न घेता पाच कोटी २५ लाख २५ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.