पिंपरी : सहकारी गृहरचना संस्थेवर प्रशासक नेमलेला असतानाही खोटी कागपत्रे बनवून संस्थेच्या खात्यातून पैसे पाठवून तब्बल ८९ लाख ६० हजार ६७६ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एक एप्रिल २०२० ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ब्लू रिच युनीट डी बिल्डींग सहकारी गृहरचना संस्था, हिंजवडी येथे घडला.
या प्रकरणी उपेंद्र भानुदास बोरकर (वय ६३, रा. चिंचवडगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संस्थेचे सचिव समरेश विश्वंभर रंजन, खजिनदार बिनोदकुमार श्रीरामसेवकप्रसाद आलोक (वय ४७, रा. ब्लू रिच सोसायटी, हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बिनोदकुमार याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लू रिच युनीट डी बिल्डींग सहकारी गृहरचना संस्थेचे उपनिबंधक सहकारी संस्था यांनी १९ ऑक्टोबर २०२१ मध्ये लेखापरीक्षण केले. त्यावेळी संस्थेत संचालक नसताना देखील व प्रशासक अधिकारी नेमेलेला असतानाही आरोपींनी संगणमताने संस्थेचा कारभार बेकायदेशीरपणे आपल्या हाती घेतला. तसेच संस्थेतील कर्मचारी व बाहेरून संस्थेला माल पुरवठा करणारे यांना हाताशी धरून खोटे कागदपत्रे दाखवून खोटी फर्म तयार करून संस्थेच्या खात्यातून पैसे पाठवून संस्थेची तब्बल ८९ लाख ६० हजार ६७६ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.