पिंपरी : जमीन विक्रीतून तीन हजारांपेक्षा जास्त जणांना दीडशे कोटींवर गंडा घातलेल्या साईरंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्सच्या के. आर. मलिक आणि त्याचा मुलगा शाहरुख मलिक यांनी दुबई व मस्कत येथे कार्यालय थाटले. तसेच तेथील भारतीय गुंतवणूकदारांना आयटी पार्कमधील जमीन कमी किमतीत देण्याचे आमिष दाखविले. अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या सिंगापूर व दुबई येथील १५ जणांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला आहे.
के. आर. मलिक याने साईरंग डेव्हलपर्स ॲण्ड प्रमोटर्सच्या माध्यमातून जमीन विक्रीतून अनेकांची फसवणूक केली. याप्रकरणी के. आर. मलिक याच्या विरोधात पुणे येथील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात १४ तर पिंपरी-चिंचवड हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाण्यात १० असे एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचा मुलगा शाहरूख मलिक याच्या विरोधात आठ गुन्हे दाखल आहेत.
मूळचा केरळ राज्यातील कोची येथील असलेला के. आर. मलिक ३० वर्षांपूर्वी पुणे येथील खडकी येथे आला. काही दिवस एका बेकरीमध्ये काम केल्यानंतर त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. त्यातून मिळालेल्या पैशांतून मुळशी तालुक्यात जमीन खरेदी केली. त्यानंतर आयटी पार्कमुळे या जमिनीला मोठा भाव आल्याने जमिनीची विक्री केली. यातून त्याने आणखी काही जमीन खरेदीसाठी व्यवहार केला. यात पाॅवर ऑफ ॲटर्नी (कुलमुखत्यार पत्र), मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग (समजुतीचा करारनामा), अग्रीमेंट टू सेल (विक्री व्यवहाराबाबतचा करारनामा) अशी कागदपत्रे तयार केली. यात खरेदी व्यवहार पूर्ण झालेला नसताना या जमिनींची साईरंग डेव्हलपर्सच्या माध्यमातून विक्री केली. यासाठी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेतले.
आयटी पार्कमुळे हिंजवडी-माणसह मुळशी तालुक्यातील जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. याचा गैरफायदा घेत मलिक पितापुत्राने मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, कासारवाई, रिहे, दत्तवाडी, नेरे, जांबे आणि पिंपळोली येथील जमिनींची विक्री करून स्थानिकांचीही फसवणूक केली. यात रिहे येथील एकच शेत जमीन शेकडो जणांना विक्री केली. यात ६५२ जणांची ७० काेटींवर फसवणूक झाल्याचे समाेर आले आहे. तसेच माण येथील १२ जणांची १२ कोटींची फसवणूक केली. साईरंग डेव्हलपर्सच्या माध्यमातून २००९ ते २०१२ या कालावधीत सर्वाधिक ६१ कोटींची गुंतवूणक झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
६० कोटींची मिळकत जप्त, ३२ बॅंक खाती गोठविली
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एककडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. के. आर. मलिक याच्या ६० कोटींच्या मिळकती जप्त केल्या आहेत. तसेच त्याची विविध बॅंकांमधील ३२ खाती गोठविण्यात आली आहेत. मलिक याच्या केरळ येथील मुळ गावी तसेच इतर ठिकाणी असलेल्या मिळकतींचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय ‘चिटर’
गुन्हे दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा तगादा सुरू झाल्याने मलिक पिता-पुत्राने भारतातून पळ काढला. त्यांनी दुबई, सिंगापूर, बहारीन व मस्कत येथे कार्यालय सुरू केले. तेथील गुंतवणूकदारांना कमी किमतीत जमीन देण्याचे आमिष दिले. यात केरळमधील अनिवासी भारतीयांची संख्या जास्त आहे. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेल्या सिंगापूर व दुबई येथील १५ जणांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे मलिक पिता-पुत्र आंतरराष्ट्रीय ‘चिटर’ असल्याचे समोर आले आहे.
चोरावर मोर
फसवणूक झालेले नागरिक रक्कम परत मिळविण्यासाठी मलिक याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अशा फसवणूक झालेल्यांना काही जण गाठतात. मलिक याच्याकडून तुमचे पैसे परत मिळवून देतो, जमीन तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून काही जण या गुंतवणूकदारांकडून पैसे उकळत असल्याचेही समोर आले आहेत. अशा चोरावर मोर असलेल्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक
फसवणूक झालेल्यांमध्ये सैन्यदल, शासकीय सेवा तसेच विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने आहेत. भारताबाहेर असलेले मलिक पिता-पुत्र हस्तकांमार्फत गुंतवणूकदारांचा शोध घेऊन त्यांची फसवणूक करतात.
‘ॲग्रीमेंट टू सेल’चा फंडा
शेतजमिनीचा सातबारा असतानाही त्यावर खरेदी-विक्री व्यवहार न करता केवळ ‘ॲग्रीमेंट टू सेल’ (विक्री व्यवहाराबाबतचा करारनामा) केला जातो. त्यामुळे जमिनीचा मूळ सातबारा कायम राहतो. तो सातबारा इतरांना दाखवून केवळ करारनाना करून फसवणूक केली जाते.
मलिक पिता-पुत्राचा शोध सुरू आहे. नागरिकांनी साईरंग डेव्हलपर्स किंवा अशा कोणत्याही व्यक्तीकडून खरेदी-विक्री करताना कायदेशीर बाबी तपासून घ्याव्यात. जेणेकरून फसवणूक टाळता येईल.
- ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट एक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड