पिंपरी : जमिनीची विक्री करून त्याचे पैसे घेऊन कागदपत्रे नावावर करून न देता घेतलेले पैसे परत न करता सात लाख ३९ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार २०१६ पासून ५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.
शिरीष शिवाजी रेडकर (वय ३६, रा. माण, हिंजवडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पूर्णचंद्र सनातन स्वाईन (वय ३६, रा. पिंपरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडविन सिटी लँडमार्क डेव्हलपर्सचे मालक स्वाईन यांनी फिर्यादीला मावळ तालुक्यातील चांदखेड येथील २४०० चौरस फूट जागा विकण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपीने वेळोवेळी सात लाख ३९ हजार ९९६ रुपये घेतले. जमिनीचे खरेदीखत करून न देता तसेच पैसे परत न देता आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली. जमीन खरेदी करायची नसून व्यवहार रद्द करण्याबाबत फिर्यादीने मेलव्दारे व लेखी पत्राव्दारे आरोपीला कळविले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीचे पैसे परत केलेले नाहीत. तसेच फिर्यादी यांच्यासारखे आरोपीने इतर लोकांनाही जागा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनाही जागा न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांचीही फसवणूक आरोपीने केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.